LIVE UPDATES

व्यवसाय करणाऱ्या बचत गटांच्या पाठीशी ताकद उभी करणार

सभापती सिद्धेश रावराणेंची ग्वाही ; करुळ येथे महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 25, 2026 17:23 PM
views 41  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुढाकार घेऊन बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय उभारले पाहिजेत. शासनाच्या योजनांचा लाभ घेत लघुउद्योगांना चालना देण्याची गरज आहे. व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना आवश्यक ते सर्व सहकार्य आणि ताकद दिली जाईल, अशी ग्वाही वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिली.

ग्रामपंचायत करुळ येथे पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे बोलत होते.

या कार्यक्रमाला उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते, रेखा सरफरे, माधवी राऊत, दिपाली जामदार, उमेदचे प्रतिनिधी सुशांत कदम, गौरी आहीर, मार्केटिंग प्रतिनिधी श्री. कासले तसेच ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव उपस्थित होते.

 श्री रावराणे म्हणाले, बचत गटातील महिलांनी केवळ पापड, लोणची अशा पारंपरिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता नव्या व्यवसायांच्या संधी शोधल्या पाहिजेत. त्यासाठी आवश्यक कर्जपुरवठा आणि इतर सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. वैभववाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या पर्यटनाचा स्थानिक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून फायदा करून घेतला पाहिजे.

कोल्हापूर जिल्ह्याने दूध व्यवसाय आणि ऊस उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधली आहे. त्याच धर्तीवर वैभववाडीतील महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे. सिंधुदुर्गातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वैभववाडीत महिला बचत गटांची संख्या आणि त्यांचा व्यवसायातील सहभाग वाढला पाहिजे. बचत गट केवळ बैठका आणि शिबिरांपुरते मर्यादित न राहता त्यांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी सातत्याने संवाद असावा. शासकीय योजनांवर अवलंबून न राहता महिलांनी स्वतःचे व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपसभापती साची कोलते म्हणाल्या, महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी घराबाहेर पडले पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन महिलांच्या पाठीशी असताना त्यांनी संधीचा लाभ घ्यावा. कुक्कुटपालन, शेळीपालन यासह विविध व्यवसायांसाठी आवश्यक प्रशिक्षण महिलांना त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे यांनीही महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले. वैभववाडीतील महिला बचत गटांची जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक गावातील महिलांनी बचत गटांमध्ये सहभागी व्हावे. बचत गट केवळ कागदावर न राहता विविध कृषी व अन्य प्रदर्शनांमध्ये आपल्या उत्पादनांसह सहभागी झाले पाहिजेत. बाजारपेठेत टिकण्यासाठी महिलांनी दर्जेदार उत्पादन व व्यवसाय व्यवस्थापनावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, सुशांत कदम, श्री. कासले आणि गौरी आहीर यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांनी व्यवसाय करताना येणाऱ्या विविध अडचणी आणि समस्यांची माहिती लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत करुळ तसेच बचत गटातील महिलांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव यांनी मानले.