
सिंधुदुर्ग : वैश्यवाणी समाजाच्या OBC जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, सन २००८च्या शासन परिपत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्री अतुल भावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वैश्यवाणी समाजाच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नासाठी आमदार किरण सामंत आणि उद्योगमंत्री तथा कोकणचे नेते आमदार उदय सामंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. समाजाला OBC जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करून समाजाच्या न्याय्य मागणीला योग्य तो न्याय मिळावा, यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे.
या संदर्भात झालेल्या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष सुनील भोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे संचालक ॲड. समीर प्रमोद वंजारी, कणकवली येथील संचालक उमेश वाळके, रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष विकास शेटये, तसेच प्रशांत शेटये, विकास संसारे, भिंगार्डे यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वैश्यवाणी समाजाच्या OBC जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत समाजाची भूमिका ठामपणे मांडली. या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
वैश्यवाणी समाजाच्या हक्कासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून शासनस्तरावर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार किरण सामंत आणि उद्योगमंत्री आमदार उदय सामंत यांचे समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.










