
वैभववाडी : कोकणात अनेक गुणवंत कलाकार आहेत. मात्र त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे महामंडळाचा सहकार्यवाह म्हणून कोकणातील प्रत्येक कलाकारापर्यंत पोहोचून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सहकार्यवाह तथा सिने दिग्दर्शक दीपक कदम यांनी केले.
महामंडळाच्या सहकार्यवाहपदी निवड झाल्यानंतर श्री. कदम हे आपल्या मूळगावी खांबाळे येथे आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मंगेश कदम, पांडुरंग गुरव, शांताराम पवार, दीपक चव्हाण, गुरुनाथ गुरव, मारुती मांजलकर, विठोबा सुतार, मंगेश गुरव, महेश लांजवळ, अंबाजी पवार, मेघनेश पवार, योगेश परब, वैभव पवार, श्याम पवार, दिनेश पालकर, रोहित पवार आदी उपस्थित होते.
श्री कदम पुढे म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलकडून दिग्दर्शक गटातून संधी मिळाली. कोकणाचे प्रतिनिधित्व म्हणून ही जबाबदारी मिळाल्याचा आनंद आहे. निवडणुकीत आमचे संपूर्ण पॅनेल बहुमताने विजयी झाले असून त्यानंतर माझ्यावर सहकार्यवाह पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, महामंडळाच्या सुमारे ४५ हजार सक्रिय सभासदांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासदांची संख्या अत्यल्प आहे. मात्र जिल्ह्यात अनेक कलाकार वर्षानुवर्षे कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना महामंडळाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. कोकणातील कलाकारांना सभासद करून घेण्यासाठी तसेच त्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम केले जाईल.
कोकणात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा आपला आग्रह राहणार असून याबाबत पहिल्याच बैठकीत ठराव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई ही कर्मभूमी असली तरी कलेचे प्राथमिक धडे जन्मभूमीतूनच मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या मातृभूमीतील कलाकारांसाठी अधिक वेळ देऊन काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.











