LIVE UPDATES

घरात पाणी शिरून वृद्ध अडकला

नगराध्यक्षांनी घेतली धाव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 20:01 PM
views 69  views

  • मोरी ब्लॉकचा फटका
  • नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून बसला धक्का 

सावंतवाडी : माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिर मागील डॉ. साईल यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. यामुळे ८१ वर्षांचे वृद्ध चंद्रकांत आकेरकर हे घरातच अडकून पडले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती कोकणसादने नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. न.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्पॉटवर बोलावून घेत तात्काळ काम करण्याचे आदेश दिले. 

बुधवारी सकाळपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात माठेवाडा आत्मेश्वर मंदिर मागील बाजूस असलेल्या घरात नाल्याचे पाणी शिरले‌. संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाचा जोर कमी होऊ लागल्यानंतर हे पाणी हळूहळू कमी होऊ लागले. मात्र, या घटनेत ८१ वर्षांचे वृद्ध चंद्रकांत आकेरकर घरातच अडकून पडले. त्यांच्या खळ्यात गुडघाभर पाणी साचले होते. तर घरातील स्वयंपाक खोलीसह हॉल, बेडरूममध्ये पाणी साचले होते. संस्थानकालीन मोरीतील काही भागात नुकतेच डागडुजी करण्याचे काम करण्यात आले.‌ मात्र, नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून रस्ता खोदताना या मोरीस धक्का पोहचल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच हे पाणी पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होऊन या परिसरात पाणी तुंबण्याचा प्रकार घडला. 

दरम्यान, घरात येणाऱ्या पाण्याबाबत यापूर्वी नगरपरिषदेला कल्पना दिली होती. मात्र, लक्ष दिलं गेलं नाही. माझं वय ८१ वर्ष असून या पाण्यात मी कसं रहायचं ? कसं जगायचं ? नगरपरिषदेचे कर्मचारी येतात आणि जातात. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. ही मोरी चोकअप असून त्यामुळेच हा प्रकार घडत आहे. मी निवृत्त शिक्षक असून औषधोपचारासाठी सावंतवाडीत राहतो. परंतु, प्रशासनाकडून होणाऱ्या या दुर्लक्षाचा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे अशी कैफियत ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत आकेरकर यांनी मांडली.

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यावर तात्काळ कार्यवाही करण्याचा शब्द देत ज्येष्ठ नागरिक श्री. आकेरकर यांना त्यांनी धीर दिला. तसेच पालिकेचे आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं मत नगराध्यक्षांनी व्यक्त केले.

तर नळपाणी योजनेच्या कामावेळी संस्थानकालीन मोरी चोकअप झाल्याचे निदर्शनास आले असून नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. आजच्या दिवसात हा प्रश्न सोडवण्यात येईल, मुख्य तिठ्यावरील प्रकार असल्याने वाहतूकीस अडचण येऊ नये याचीही दक्षता घेऊ अशी माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी दिली. याप्रसंगी माझ्या वयाचा विचार करून सर्वजण आले त्यासाठी धन्यवाद देतो. सावंतवाडीत माझा जन्म झाला असून औषध उपचारासाठी या घरात राहत आहे. ही नैसर्गिक आपत्ती असून ही समस्या नगराध्यक्षा दूर करतील, असा विश्वास ज्येष्ठ नागरिक श्री. आकेरकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, बांधकाम अभियंता तुषार सरडे, आरोग्य विभागाचे दीपक म्हापसेकर, पाणी पुरवठा विभागाच्या प्राजक्ता कांबळे, मनोज राऊळ, शिवम भिसे, सुमित वारंग, स्थानिक नंदू गावडे, बाबल्या दुभाषी, पुंडलिक दळवी, गौरांग चिटणीस आदींसह माठेवाडा येथील रहिवासी उपस्थित होते.