LIVE UPDATES

सिद्धिविनायक रिअल इस्टेटच्या पुढाकारातून १३९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

"शिक्षणातून गावातील मुले मोठी अधिकारी व्हावीत, हेच आमचे ध्येय" – परेश रूमडे
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 17:11 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असून, आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे, समाजात स्वतःसह गावाचे नाव उज्ज्वल करावे, या उदात्त भावनेतून सिद्धिविनायक रिअल इस्टेट, टिळकनगर, चेंबूर या संस्थेचे संचालक किशोर रेवडेकर हे गेली अनेक वर्षे सातत्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत दहिबाव बागमळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य परेश रूमडे यांनी व्यक्त केले.

सिद्धिविनायक रिअल इस्टेट, टिळकनगर, चेंबूर आणि बागमळा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दहिबाव व मिठबाव केंद्र गटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सिद्धिविनायक रिअल इस्टेटचे संतोष माने, सरपंच सचिन नाचणकर, केंद्रप्रमुख शिंदे, नरेश राणे,  शुभांगी राणे, बाळा शेट्ये, मुकेश पारकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. शेट्ये,विजया दहिबावकर, विजय परब बँक ऑफ इंडियाचे श्री. चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना केंद्रप्रमुख शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत शाळेचा विद्यार्थीपट टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. मात्र पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत, असा विश्वास आम्ही पालकांना देत आहोत. या विश्वासामुळे अनेक पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करत आहेत.

ते पुढे म्हणाले की, सिद्धिविनायक रिअल इस्टेट संस्थेच्या सामाजिक बांधिलकीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येते. त्यामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, शाळेचा पट टिकवून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. यापूर्वी या संस्थेमार्फत केवळ दहिबाव केंद्रातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत होते. मात्र आता हा उपक्रम विस्तारत मिठबाव केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. हा उपक्रम समाजासाठी आदर्श आणि कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात मिठबाव नं. १, मिठबाव फाटकवाडी, मिठबाव शेगुलवाडा, दहिबाव नं. १, दहिबाव प्रभूवाडी, नारीग्रे नं. १ व २ यांसह दहिबाव व मिठबाव केंद्र गटातील विविध शाळांमधील एकूण १३९ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल व अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये आणि शिक्षणाची गोडी वाढावी, या उद्देशाने सिद्धिविनायक रिअल इस्टेट संस्थेचा हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविला जात असून, या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक आणि शिक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.