
कणकवली : मुक्तांगण प्री स्कूल, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा आणि संत साहित्यावर आधारित नृत्य, अभंग, भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गणेश राणे (निवृत्त कॅश मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया) तसेच कांचन राणे आणि मान्यवर अतिथी म्हणून परशुराम झगडे सर उपस्थित होते.कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सुलेखा राणे , खजिनदार रमेश राणे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर संस्थेच्या पदाधिकारी प्रणाली सावंत , मुख्याध्यापिका अनघा राणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करत, विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश दिला. आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि संस्कारमूल्यांची जोपासना व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पालक व उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसाने आणि उत्साहाने भारावून गेला.













