LIVE UPDATES

पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट मार्गे कोल्हापूर-पुणे मार्गावर कदंबा बससेवा सुरू करा

उपसभापती गणेशप्रसाद गवस यांची केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 07:43 PM
views 17  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट-कोल्हापूर-पुणे या मार्गावर गोवा राज्याच्या कदंबा परिवहन महामंडळाची नियमित बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका हा गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत असून तालुक्यातील नागरिकांचे पणजी, कोल्हापूर आणि पुणे या शहरांशी नियमित येणे-जाणे असते. मात्र, या शहरांना जोडणारी थेट व नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट-कोल्हापूर-पुणे या मार्गावर कदंबा परिवहन महामंडळाची नियमित बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ व प्रवास खर्च वाचणार आहे. तसेच गोवा, दोडामार्ग, कोल्हापूर व पुणे या शहरांदरम्यान थेट संपर्क निर्माण होऊन पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

दोडामार्ग तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बससेवा अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी निवेदनातून मांडली आहे. या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणीही उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी केली आहे.