LIVE UPDATES

१ तारखेपासून पुन्हा सुरू होणार देवगड - बोरीवली एसटी सेवा

आगार व्यवस्थापकांचे स्थानिक नागरिकांनी आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 25, 2026 16:20 PM
views 25  views

देवगड : देवगड एसटी आगारातून मुंबईसाठी एकही बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. बंद करण्यात आलेली एकमेव देवगड–बोरीवली एसटी बस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी बस सेवा तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. देवगड एसटी आगारातून मुंबईकडे जाणारी एकही बस सेवा सध्या सुरू नसल्याने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यापूर्वी सुरू असलेली देवगड–बोरीवली एसटी बसदेखील बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर उल्हास मणचेकर, संजय बांदेकर आणि मारुती उपरकर यांनी देवगड एसटी आगाराचे डेपो व्यवस्थापक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. देवगड–बोरीवली बस तात्काळ सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावर डेपो व्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद देत १ तारखेपासून देवगड–बोरीवली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.