
सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी ज्युनियर कॉलेजच्यावतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण संस्कृती, परंपरेबद्दल जागृती व्हावी या उद्देशाने 'रानभाजी व आठवडा बाजार' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थी वर्गाकडून उदंड असा प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम दुपारी १२ ते २ या वेळेत कॉलेजच्या 'नवरंग कलामंच' येथे आयोजित करण्यात आला होता. या आठवडा बाजारामध्ये कोकणातील समृद्ध निसर्गातून मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आरोग्यदायी रानभाज्या तसेच स्थानिक उत्पादनांची विक्री व प्रदर्शन केले गेले. यामध्ये प्रामुख्याने आरोग्यदायी रानभाज्या करटोली, टाकळा, अळंबी, पेवगा भाजी आणि शेपू भाजी, अस्सल गावठी अंडी व गावठी तांदूळ, तांदळाचे लाडू, बेसन लाडू, ताजे दही आणि ताक आदींचा समावेश होता.
गावाचा अभिमान जपूया, स्थानिक उत्पादने वापरूया हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात कॉलेजच्या सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव मिळण्यासोबतच स्थानिक शेती, रानभाज्यांचे औषधी महत्त्व आणि ग्रामीण जीवनशैलीची जवळून ओळख झाली. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










