
सिंधुदुर्गनगरी : "सिंधुदुर्गची संस्कृती, येथील माणुसकी आणि पत्रकारांनी दिलेले सहकार्य यामुळे हा जिल्हा माझ्यासाठी केवळ कार्यक्षेत्र राहिला नाही, तर तो माझा आपलासा झाला आहे. कोकणी माणूस फणसासारखा असतो, बाहेरून काटेरी वाटला तरी आतून अत्यंत गोड असतो. आज बदली होऊन मी अहिल्यानगरला जात असलो, तरी मी तुमचाच आहे. अहिल्यानगरला केव्हाही या, तुमचे मनापासून स्वागत असेल. बदली झाली तरी आपले मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे नाते कायम राहील," असे भावनिक उद्गार जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी काढले.
सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली झाल्याने जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असताना मुकुंद चिलवंत यांनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. पत्रकारांना आवश्यक माहिती तत्परतेने उपलब्ध करून देणे, सर्वांना समान वागणूक देत सकारात्मक संवाद राखणे आणि प्रसारमाध्यमांना प्रशासनाचा विश्वासार्ह दुवा म्हणून सहकार्य करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये ठरली. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी पत्रकारांमध्ये विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले.
यावेळी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर म्हणाले, "मुकुंद चिलवंत हे अधिकारी म्हणून कधीच जाणवले नाहीत. त्यांनी नेहमीच मित्र म्हणून पत्रकारांशी नाते जपले. त्यांचे कार्यालय पत्रकारांसाठी सदैव खुले असायचे. पत्रकारांना कोणत्याही माहितीची आवश्यकता भासल्यास त्यांनी तत्परतेने सहकार्य केले. 'अधिकारी कम मित्र' अशी त्यांची ओळख कायम राहील. त्यांच्या बदलीमुळे सिंधुदुर्गला एका संवेदनशील आणि समन्वय साधणाऱ्या अधिकाऱ्याची उणीव भासेल."
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघांचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, बाळ खडपकर आणि संदीप गावडे यांनी मनोगत व्यक्त करत मुकुंद चिलवंत यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांनी पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुसंवादी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सचिव दत्तप्रसाद वालावलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद दळवी यांनी मानले.
या सत्कार समारंभास पत्रकार संघाचे खजिनदार गिरीश परब, संजय वालावलकर, नंदकुमार आयरे, रवी गावडे, सतीश हरमलकर, मनोज वारंग तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी अमित राणे, शंकर आडेलकर यांच्यासह पत्रकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद चिलवंत यांच्या बदलीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम केवळ औपचारिक सत्कार न ठरता, प्रशासन आणि पत्रकारिता क्षेत्रात जपलेल्या स्नेहबंधांचा भावनिक क्षण ठरला. सिंधुदुर्गने दिलेले प्रेम आणि आपुलकीची भावना व्यक्त करत त्यांनी निरोप घेतला.











