
सावंतवाडी : कारिवडे गावातच बालपण व शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या गरीब कुटुंबातील प्रणव उमेश भालेकर (वय 20) व मंथन एकनाथ कांबळी (वय 20) या दोन्ही तरुणांची सैन्य दलात अग्नीवीर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचा सन्मान माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आला.
यावेळी अग्नीवीर प्रणव भालेकर म्हणाले, हा सन्मान मला आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मिळाला हे माझे भाग्य समजतो. माझे बालपण व दहावीपर्यंतचे शिक्षण कारिवडे प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयात झाले. माझे आई-वडील, गुरुजन, शिक्षक वर्ग तसेच मराठा अकॅडमीचे शिक्षक-प्रशिक्षक यांनी मला प्रोत्साहन दिले, त्यामुळेच मी हे यश गाठू शकलो. मला आर्मीत जाण्याची प्रबळ इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आहे. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहर प्रमुख नगरसेवक बाबू कुडतरकर, गजानन नाटेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, महिला शहर प्रमुख भारती मोरे, शैलेश मेस्त्री, नंदू गावडे, एकनाथ हद्णकर, संजय माजगावकर, राजन रेडकर, संदेश सोनुर्लेकर आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मंथन कांबळी यांची आई अंकिता कांबळी यांनी सत्कार स्वीकारला.
यावेळी अशोक दळवी म्हणाले की, सावंतवाडी तालुक्याला सैनिकी परंपरा आहे. कारिवडे गावातील या दोन तरुणांनी सैन्य दलात अग्नीवीर म्हणून नियुक्त होऊन राष्ट्रसेवा व देशप्रेमाचे पालन करावे, त्यांनी तालुक्याचे नाव अजरामर करावे अशी भावना व्यक्त केली. सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना सावंत यांनी केले. यावेळी सैनिक महासंघाचे माजी सैनिक दिगंबर नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष विष्णू ताम्हणकर व माजी सैनिक तलाठी धोंडी उर्फ प्रशांत पास्ते यांनीही या अग्निवीरांचे विशेष कौतुक केले.











