LIVE UPDATES

देवगड हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हाडांच्या घनतेची तपासणी

१४० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; किशोरवयीन मुलांसाठी सिंधुदुर्गातील पहिलाच उपक्रम
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 18:24 PM
views 19  views

देवगड : येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हाडांच्या घनतेची (Bone Mineral Density - BMD) तपासणी करण्यासाठी विशेष निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार, १६ जुलै रोजी करण्यात आले. मँगो सिटी डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, मॅक्लाउड्स फार्मास्युटिकल कंपनीच्या ऑस्टेवा डिव्हिजन आणि डॉ. दत्तप्रसाद सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात सुमारे १४० विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी लाभ घेतला.

किशोरवयीन मुलांमध्ये हाडांच्या घनतेची तपासणी करण्याचा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असून, डॉ. दत्तप्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून तो साकार झाला. हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) हा केवळ वयोवृद्धांचा आजार नसून त्याची सुरुवात किशोरवयातच होऊ शकते. त्यामुळे लहान वयातच हाडे मजबूत राहण्यासाठी योग्य तपासणी आणि जनजागृती आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन देवगडमधील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. के. एन. बोरफळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रतिबंधात्मक वैद्यकाचे महत्त्व विशद करत, वेळेत आरोग्य तपासणी केल्यास अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात, असे सांगितले. तसेच ऑस्टिओपोरोसिसविषयी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट करताना भारतीय किशोरवयीन मुलांच्या हाडांच्या घनतेविषयी पुरेशा प्रमाणात संशोधन झालेले नसल्याचे नमूद केले.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती समजून घेण्यास मदत होणार असून भविष्यातील आरोग्यदायी पिढी घडविण्यास हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. स्वप्नील शिंगाडे व डॉ. धनंजय भिडे यांनीही विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. उद्घाटन समारंभास रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या अध्यक्षा सौ. अनुश्री पारकर, दयानंद पाटील, गौरव पारकर, अनिल गांधी, रमाकांत आचरेकर, तसेच मॅक्लाउड्स फार्मास्युटिकल कंपनीचे रिजनल मॅनेजर गजानन चौगुले, सुनील वेदरे आणि बीएमडी टेक्निशियन निलेश देसाई उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शेठ म. ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मँगो सिटी डॉक्टर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कर्णिक यांनी केले.


देवगड हायस्कूल येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर बोरफळकर