
देवगड : देवगड तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांच्या आरक्षणात बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, १७ जुलै रोजी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या विविध अधिसूचना तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या सुधारित आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच आरक्षणामध्ये काही बदल करण्यात आले असून, त्यानुसार देवगड तालुक्यातही सुधारित आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार देवगड तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायती असून त्यामधील सरपंच पदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग अशा विविध गटांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या नव्या सूचनेनुसार काही आरक्षित पदांमध्ये बदल करण्यात येणार असून, त्यासाठी १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता देवगड तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येईल.
या प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.सरपंच पदांच्या आरक्षणातील बदलामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता १७ जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.











