
सावंतवाडी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी केली. वारकरी वेशभूषा, हातात टाळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि डोळ्यांत भक्तिभाव अशा रूपात विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा अनुभव घेतला.
यावेळी मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. चिमुकल्या वारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत भक्तिभावाने नामस्मरण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक मूल्यांची ओळख करून देण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य आबा केसरकर, सचिन मळीक, हेमंत केसरकर, सुमित वाडकर उपस्थित होते. शाळेच्या उपप्राचार्या अवंतिका नाईक तसेच शिक्षक वृंद प्राची परब, निधी सावंत, महिमा चारी, दिनेश जाधव, मयुरी ठाकूर, अस्मिता परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.











