
सावंतवाडी : वेत्ये येथील काळा दगडाच्या खाणीवर अनधिकृत उत्खनन होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर नागपूर येथून अधिकारी चौकशीसाठी खाणीत आले होते. यावेळी खाण मालकांनी तक्रारदारांना बेदम मारहाण करत, त्यांच्या गाड्या अडवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने बॉण्ड पेपरवर सह्या घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेत्ये येथील अनधिकृत उत्खननाबाबत साईप्रसाद कल्याणकर यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून नागपूर येथून शासकीय अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले होते. यावेळी क्षेत्रफळ मंडळ अधिकारी आणि तक्रारदार साईप्रसाद कल्याणकर व महेश अंकुश सावंत घटनास्थळी उपस्थित होते. अधिकारी खाणीत मोजमाप घेत असताना, तक्रार केल्याच्या रागातून खाण मालक बाबुराव तेंडोलकर, शेजारील खाण मालक सुभाष राणे आणि प्रभाकर राणे यांनी हल्ला चढवल्याची तक्रार तक्रार दारांनी दिली. आपल्या कारवर ठोसे मारून नुकसान केले आणि मोबाईल हिसकावून घेत तो फोडून टाकला. इतकेच नव्हे तर, तेंडोलकर यांनी खाणीतील डंपर बोलावून गाडीच्या पुढे व मागे लावले. ज्यामुळे बाहेर पडण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झाला असेही त्यांनी म्हटले आहे.
महेश सावंत यांनी सांगितले की, आपणास गाडीतून ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तेंडोलकर याने मोटारसायकलमधील पेट्रोल काढून "संध्याकाळनंतर थांबलात तर गाडी पेटवून देऊ" अशी धमकी दिली. तर सुभाष राणे यांनी दगड उगारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व राणे पिता-पुत्राने चपलेने मारहाण केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सागर राणे, जितू गांवकर आणि गुणाजी गावडे यांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही तेंडोलकर यांनी बेकायदेशीरपणे बॉण्ड पेपर आणून यापुढे तक्रार करणार नाही, असे लिहून घेत जबरदस्तीने सह्या घेतल्याचे तक्रारदारांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर १ मे २०२६ रोजी तक्रारदारांनी प्राथमिक तक्रार अर्ज दिला होता. आज दिनांक ६ मे रोजी साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर राहून सविस्तर जबाब नोंदवला. या फिर्यादीवरून पोलिसांनी बाबुराव तेंडोलकर, सुभाष राणे आणि प्रभाकर राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार व बीट अंमलदार हनुमंत धोत्रे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.










