
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांचा उद्योग, व्यवसाय आणि जिल्ह्याच्या विकासातील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेली ‘अबोली ऑटो रिक्षा’ योजना महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे नेतृत्व आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील महिलांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे. महिलांच्या हाताला काम, कुटुंबाला आर्थिक आधार आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ही योजना प्रभावी ठरत आहे.
महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे, आत्मविश्वासाने व्यवसायात उतरावे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावावी, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने महिलांना सवलतीच्या ९ टक्के व्याजदराने अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. रिक्षा खरेदीसाठी ८५ टक्के कर्जपुरवठा बँकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक आधार मिळत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांची लोकसंख्या सुमारे साडेपाच लाख असून, ती पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, लोकसंख्येतील मोठा वाटा असूनही जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय आणि अर्थकारणामध्ये महिलांचा सहभाग अपेक्षेइतका दिसून येत नव्हता. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिक मदत करणे आणि स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक होते. हीच गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. ‘अबोली ऑटो रिक्षा’ योजनेतून महिलांना केवळ कर्जपुरवठा न करता त्यांना स्वावलंबी बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. स्वतःच्या मेहनतीतून उत्पन्न मिळविण्याचा मार्ग या योजनेमुळे खुला झाला.

जिल्हा बँकेच्या आर्थिक सहकार्याला मदतीची जोड मिळाल्याने महिलांसाठी रोजगाराची संधी अधिक सुलभ झाली. बँकेचे अर्थसाहाय्य आणि पालकमंत्र्यांचे सहकार्य यांचा समन्वय साधत महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
जिल्ह्यातील महिलांची हिम्मत वाढावी, त्यांनी कष्टाच्या जोरावर पुढे यावे आणि आत्मविश्वासाने स्वतःचा व्यवसाय उभा करावा, हा जिल्हा बँकेचा प्रमुख उद्देश आहे. महिलांचा उद्योग, व्यवसाय आणि अर्थकारणातील सहभाग वाढविण्यासाठी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे,” असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








