
कुडाळ : कुडाळ येथील महाविद्यालय परिसर आणि मुख्य रस्त्यावर दुचाकी वाहने अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर अखेर कुडाळ पोलीस वाहतूक शाखेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. आज (गुरुवारी) कुडाळ महाविद्यालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर दंडात्मक (चलन) कारवाई केली.
महाविद्यालय परिसरामध्ये काही विद्यार्थी अतिशय वेगात आणि धोकादायक रीतीने गाड्या चालवत असल्याच्या तक्रारी नागरिक व प्रशासनाकडे वारंवार येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कुडाळ वाहतूक शाखेच्या पथकाने आज महाविद्यालयाबाहेर कारवाई केली आहे. वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याच मोहिमेदरम्यान दुचाकी चालवताना मोबाईलवर संभाषण करणाऱ्या काही चालक व नागरिकांवरही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
पालकांकडे हट्ट धरून अनेक विद्यार्थी कॉलेज किंवा शाळेत येण्यासाठी दुचाकी गाड्या घेऊन येतात. मात्र, गाडी हातात आल्यानंतर हे विद्यार्थी रस्त्यावर एकमेकांमध्ये शर्यती लावल्यासारख्या गाड्या पळवतात. शाळेतून किंवा कॉलेजमधून सुटल्यानंतर वाहनांचा वेग इतका जास्त असतो की, यामुळे स्वतः विद्यार्थ्यांच्या आणि रस्त्यावरील इतर वाटचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होतो. विद्यार्थी दशेत असताना मुलांना सहजासहजी महागड्या व सुसाट धावणाऱ्या गाड्या देणे हे किती जीवावर बेतू शकते, याचा अंदाज आजही अनेक पालकांना येत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
"पालकांनी आपल्या अल्पवयीन किंवा शिकणाऱ्या पाल्यांच्या हातात वाहने देताना योग्य ती काळजी घ्यावी. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील."












