
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या तीव्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून जलपुनर्भरण व जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले होते. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या या महत्त्वाच्या सूचनेला अनुसरून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीने जलसंधारणाच्या कामात आघाडी घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून लोकसहभाग व श्रमदानातून कसई गावठाण येथील गणेश घाट येथे यशस्वीरीत्या कच्चा (वनराई) बंधारा उभारण्यात आला.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी (सर्व नगरसेवक व नगरसेविकांना पत्र पाठवून श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आणि आपापल्या प्रभागातील नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले होते. मुख्याधिकाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता 'कसई गावठाण गणेश घाट' येथे भव्य श्रमदान मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत लक्ष्मी सिताराम हळबे कॉलेजचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, नगरपंचायत कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुख्याधिकारी श्री. संकेत गायकवाड यांनी स्वतः नदीपात्रात उतरून या मोहिमेचे नेतृत्व केले. लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी हातात हात घालून नदीपात्रात उतरत पोत्यांमध्ये माती व वाळू भरून बंधाऱ्याची भक्कम उभारणी केली. स्थानिक साहित्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून हा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.
पाणीटंचाईवर पूर्वोपाय: आगामी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसाठा निर्माण करणे. भूजल पातळीत वाढ: बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची (बोरवेल) पाणीपातळी वाढण्यास थेट मदत होणे.शाश्वत विकास व सामुदायिक एकोपा: लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाच्या व शहराच्या शाश्वत विकासाला चालना देणे.
मुख्याधिकारीच्या मार्गदर्शनाखाली कसई-दोडामार्ग शहरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी ४ ठिकाणी बंधारे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. उर्वरित ठिकाणीही लवकरच बंधारे बांधणे नियोजित आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी नागरिकांनी अशाच प्रकारे श्रमदानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन साद द्यावी, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, शिक्षण व आरोग्य सभापती संजना म्हावळणकर आणि मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या संयुक्त नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या श्रमदान मोहिमेस नगरसेवक संतोष नानचे, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, लक्ष्मी सिताराम हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत, सिताराम खडपकर यांच्यासह नगरपंचायतीचे नगर अभियंताअभिषेक नेमाने, लेखापाल आनंद परब, पंप ऑपरेटर सुभाष केतकर, वॉलमन प्रथमेश चव्हाण, लिपिक संजय शिरोडकर, वर्षा रेडकर, स्थापत्य प्रबोधन मठकर, शहर समन्वयक सिद्धेश शेगले तसेच नगरपंचायत कर्मचारी सूर्यानारायण गवस,प्रमोद कोळेकर, प्रणाली शेटकर, साईकक्षा सौन्देकर, तृप्ती परब, वैष्णवी गवस, शुभम पालकर, विठ्ठल कुबल, स्वच्छता दूत आणि हळबे कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








