
लक्ष्मण आडाव
सिंधुदुर्ग : सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारा कणकवली गडनदीनजीक सुदर्शन मित्रमंडळाची भजन मंडळी घेऊन डबलबारी भजनासाठी जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले. अपघात तब्बल ५४ जणांचा तडफडून मृत्यू झाला, तर त्या अपघातातील २७-२८ जण गंभीर जखमीच्या जीवनाला कायमस्वरूपी जखमा ठेवणारा हा भीषण अपघात ठरला. त्या अपघाताची आठवण जरी आली तरी आजही थरकाप उडतो.
गडनदी पुलापासून अवघ्या २० फूट गेल्यानंतर डाव्या बाजूला दूरीत ट्रक कोसळला, ट्रकमध्ये हौद्यात ८० ते ९० मंडळी उभी होती. ट्रकच्या कॅरियरवर १० ते १२ जण बसले होते. तर केबीनमध्ये मंडळाचे बुवा अर्जुन तावडे, बाबू आरोलकर, गणपत टिकले ही जाणती मंडळी आत बसली होती, या ट्रकमध्ये सुमारे १२० ते १२५ मंडळी प्रवास करत होती. त्यांच्यावर अचानक काळाने घाला घातला.
भजन मंडळी घेवून जात असताना ट्रकची बंदिस्थ व्यवस्था असल्याने अपघातानंतर चिरडून अनेकांचा जागीच मृत्यू झाला, ५८ वर्षांपूर्वी ५४ जणांचा मृत्यू तर २७ ते २८ जण गंभीर जखमी झाले होते. तेळी आळी येथे धावत धावत जाऊन झालेल्या भीषण अपघाताची माहिती प्रकाश हर्णे गुरूजी यांनी दिली. अपघाताची त्या काळरात्रीच्या जखमा आजही ओल्याच कणकवलीतील भजनमंडळींचा तो अपघात म्हणजे भजनी कलाकारांसाठीच एक धक्का होता.
तेली आळीतील प्रत्येक घरात दुःखाचा डोंगर पसरला होता. ५८ वषार्पूर्वी त्या काळात सिंधुदुर्गात तशी आरोग्य व्यवस्था तोकडीच होती. त्यावेळी वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पिटलचे डॉ. सीटन यांना अपघाताची माहिती देण्यात आली. ते रुग्णवाहिका घेऊन कणकवली येथे पोहोचले.
डॉ. सीटन यांनी गंभीर रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेत घालून वेंगुर्लेतील हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांच्यावर उपचार केले. त्याकाळातील त्यांचे उपचार म्हणजे देवदूताप्रमाणेच त्यांची सेवा ठरली आहे. त्यांच्या या आरोग्य सेवेबद्दल कणकवलीकरांच्या मनात आजही आठवणी जागवत आहेत.














