LIVE UPDATES

वैभववाडी बसस्थानकात संशयित बॅग; पोलिसांची धावपळ

बॉम्बशोधक व नाशक पथकासह दहशतवादी पथक दाखल ; आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रंगीत तालीम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 12:29 PM
views 122  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वैभववाडी : पोलीस ठाण्यात फोन खणाणला... समोरून माहिती मिळाली, वैभववाडी बसस्थानक परिसरात एक संशयित बॅग आढळली आहे! बॅगेत स्फोटके असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बॉम्बशोधक व नाशक पथकासह दहशतवादी पथकालाही पाचारण करण्यात आले. काही वेळातच दोन्ही पथके दाखल झाली आणि बसस्थानक परिसरात पोलिसांची लगबग सुरू झाली. मात्र, ही कोणतीही खरी घटना नव्हती, तर आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी आयोजित केलेली रंगीत तालीम होती.

 वैभववाडी बसस्थानकात संशयित बॅग आढळल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून पोलिसांनी ही रंगीत तालीम घेतली. बॅगेमध्ये स्फोटक असल्याचा संशय व्यक्त होताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. त्यानंतर ओरोस येथील बॉम्बशोधक व नाशक पथक आणि दहशतवादी पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयित बॅगेची काळजीपूर्वक तपासणी करून नियोजित प्रक्रियेनुसार संभाव्य धोका निष्प्रभ करण्याची कार्यवाही करण्यात आली.

  या संपूर्ण कारवाईदरम्यान बसस्थानक परिसरात पोलिसांची मोठी उपस्थिती दिसून आली. त्यामुळे काही काळ बसस्थानक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्यक्षात कोणताही धोका नसून, आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधला जातो, संशयित वस्तू आढळल्यास कोणती खबरदारी घेतली जाते आणि तातडीने कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची पडताळणी करण्यासाठी ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.

 या रंगीत तालीममध्ये पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, उपनिरीक्षक उल्हास जाधव, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, धनाजी धडे, अजय शिल्पे, मोहन राणे, जितेंद्र कोलते, संतोष माने, रणजित सावंत, तसेच महिला पोलीस कर्मचारी पुजाली निकम, कोमल पाटील आणि वैशाली कोलते यांनी सहभाग घेतला.

ओरोस येथील बॉम्बशोधक व नाशक पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय साटम, पोलीस हवालदार सुकर्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमित राणे व लक्ष्मण जाधव, तसेच दहशतवादी पथकातील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल परब यांनीही या सरावात सहभाग घेतला.

  संकटकाळात तत्परता, अचूक निर्णय आणि विविध पथकांमधील समन्वय यांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी ही रंगीत तालीम महत्त्वपूर्ण ठरली. अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे, याचा प्रत्यय या सरावातून आला.