
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५४८ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र मुलांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
बालकांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीवर जंतसंसर्गाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालकांचे आरोग्य, पोषण आणि एकाग्रता सुधारण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अंगणवाडीतील बालके, शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच शाळाबाह्य मुले आणि किशोरवयीन मुला-मुलींनाही या मोहिमेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली २२ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत मोहिमेचे नियोजन, विविध विभागांतील समन्वय आणि जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत औषधोपचार पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गनगरीचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक उगारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सतीश गुजलवार आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे उपस्थित होते.
वयोगटानुसार जंतनाशक गोळ्यांची मात्रा
या मोहिमेत अल्बेंडाझोल ४०० मि.ग्रॅ. या जंतनाशक औषधाचा वापर करण्यात येणार आहे. निर्धारित सूचनांनुसार १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना अर्धी गोळी, तर २ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्ण गोळी पावडर करून पाण्यात विरघळवून देण्याचे नियोजन आहे. ३ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक पूर्ण गोळी चावून खाण्यास देण्यात येणार आहे. औषध देताना आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन केले जाणार आहे.
आरोग्य, शिक्षण आणि महिला-बालविकास विभागाचा सहभाग
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांच्या सहकार्याने पात्र बालकांपर्यंत जंतनाशक औषधे पोहोचविण्यात येतील.
२७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक दिनी औषध घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र बालकांना आणि किशोरवयीन मुला-मुलींना ३ नोव्हेंबरच्या मॉप-अप दिनी गोळ्या देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पात्र बालकांना जंतनाशक औषधाचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








