
सावंतवाडी : गेले दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. या संततधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. त्यातच मंगळवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसात तांबोळी येथे एक मोठी दुर्घटना घडली.
तांबोळी येथील रहिवासी मायावती प्रभाकर देसाई यांच्या शेतमांगरावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एक मोठे सागवानाचे झाड कोसळले. या अपघातात शेतमांगराचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि परिसरात कोणीही नसल्याने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही व मोठी जीवितहानी टळली. मात्र, झाड कोसळल्यामुळे शेतमांगराच्या छपरासह आतील सर्व साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमांगराच्या लगत असलेले हे सागवानाचे झाड उन्मळून पडल्याने लोखंडी छप्पर आणि पत्रे पूर्णतः निकामी झाले असून शेतमांगराच्या भिंतींनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच मांगरात ठेवलेल्या पावसाळी शेतीविषयक वस्तू भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून संबंधित नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.











