LIVE UPDATES

Sindhudurg Jatra Festival : सिंधुदुर्गातील पहिली जत्रा कुठे?

आपल्‍याला हे माहित आहे का?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 07:39 PM
views 307  views
Aawalegaon Dahi Kala Jatra 2026 at Shri Dev Narayan Temple in Kudal, Sindhudurg, featuring traditional palkhi procession and Dashavatari drama.

सावंतवाडी : दिवाळीचा फराळ संपला की, तळकोकणाला वेध लागतात ते जत्रोत्सवांचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रांच्या या महाहंगामाची सुरुवात कुडाळ तालुक्यातुन होते. संपूर्ण जिल्ह्यातील 'पहिली जत्रा' ही कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिराची असते.

कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या पावन मुहूर्तावर म्हणजेच यंदा शनिवारी, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आवळेगावचा हा प्रसिद्ध दहीकाला उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. या जत्रेची रंगत पाहण्यासारखी असते. सकाळी ८ वाजता अभिषेकाने उत्सवाची सुरुवात होते, तर १० वाजता भक्तीमय पायी दिंडी निघते.

सायंकाळी हरिपाठ, आणि रात्री ११.३० वाजता निघणारी श्रींची पालखी प्रदक्षिणा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा. सोबतच शेजारील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातही कार्तिकी एकादशीचा उत्साह ओसंडून वाहत असतो. 

कोकणची जत्रा आणि दशावतार हे तर एक अतूट नातं. रात्री १२.३० वाजता खानोलकर दशावतार कंपनीच्या दशावतारी नाटकाने या दहीकाला उत्सवाची रंगत आणखी वाढते. या जत्रेसाठी गावातील प्रत्येक अंगण सडा-रांगोळीने सजतं आणि मुंबई-पुण्याहून चाकरमानी आवर्जून गावी दाखल होतात. विशेष म्हणजे, या यात्रेच्या दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे २२ नोव्हेंबरपासून कोकणात तुळशी विवाहांची लगबग सुरू होते.

संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद