LIVE UPDATES

तिलारी-विजघर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाला अखेर सुरुवात

दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय; रास्ता रोको आंदोलनानंतर ठेकेदाराकडून काम सुरू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 08:16 PM
views 84  views

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी-विजघर राज्यमार्गाच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामासाठी दशक्रोशीतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला यश आले असून अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाला गती मिळाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तिलारी-विजघर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराने अर्धवट स्थितीत ठेवले होते. पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीमुळे हे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार होते. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही ठेकेदाराकडून काम सुरू करण्यात येत नव्हते. परिणामी, राज्यमार्गावर ठिकठिकाणी खोदाई करून ठेवल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढू लागले होते.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख मदन राणे, संतोष मोर्ये, संदेश वरक यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत संबंधित ठेकेदाराने सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र प्रशासनाला व आंदोलनकर्त्यांना दिले होते. त्यानुसार सोमवारी तहसीलदार राहुल गुरव यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.

प्रशासनाचा पाठपुरावा, आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका आणि तिलारी खोऱ्यातील दशक्रोशीतील ग्रामस्थांची एकजूट यामुळे अखेर ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात असून, राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम आता वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.