
सिंधुदुर्गनगरी : बालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या SAANS (Social Awareness and Actions to Neutralize Pneumonia Successfully) अभियानाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जागतिक न्यूमोनिया दिनाचे औचित्य साधून दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हे अभियान फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे.
बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करणे, न्यूमोनियाची लक्षणे वेळेत ओळखणे, योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि बालमृत्यू रोखणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ नुसार न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू प्रति हजार जिवंत जन्मांमागे तीनपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत Protection (संरक्षण), Prevention (प्रतिबंध) आणि Treatment (उपचार) या त्रिसूत्रीवर विशेष भर देण्यात येणार आहे. जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान, सहा महिन्यांनंतर पूरक आहार, वेळापत्रकानुसार लसीकरण, जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा, हातांची स्वच्छता आणि घरातील हवा प्रदूषणमुक्त ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी Pneumococcal Conjugate Vaccine (PCV) लसीकरणाबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यात, चौदाव्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात PCV लसीचे डोस देण्यात येतात. जास्तीत जास्त पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना न्यूमोनियाची लक्षणे ओळखणे, बालकांचे वर्गीकरण करणे आणि योग्य उपचार देणे याबाबत प्रशिक्षण व उजळणी सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व इतर सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये न्यूमोनिया उपचारासाठी आवश्यक औषधे, ऑक्सिजन सुविधा, पल्स ऑक्सिमीटर, नेब्युलायझर व इतर आवश्यक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येणार आहे. गंभीर आजारी बालकांना तातडीने उपचार व आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
गृहभेटी, माता बैठका, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण दिवस, सोशल मीडिया, पोस्टर्स, व्हिडिओ संदेश, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत न्यूमोनिया प्रतिबंध व उपचारासंबंधी माहिती पोहोचविण्यात येणार आहे.
बालकांमध्ये जलद श्वासोच्छ्वास, छाती आत ओढली जाणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. बालकांच्या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
न्यूमोनिया नाही तर बालपण सही’ या घोषवाक्याद्वारे पालक, कुटुंबीय आणि समाजातील सर्व घटकांनी बालकांना न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








