
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात एकूण १२८ शासन मान्य ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासंदर्भात व त्याचा निपटारा कशा पद्धतीने करता येईल, या दृष्टीने येत्या १९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची व शासकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व संचालक अॅड. संतोष सावंत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांना काय अडचणी, समस्या भेडसावत आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती दिली व एकत्रित बैठक घेऊन समस्या, अडचणींवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने विचार व्हावा, असे श्री. मस्के यांनी सुचित केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. कामत यांनी स्पष्ट केले, निश्चितपणे ग्रंथालयांना काय समस्या, अडचणी आहेत, त्या संदर्भात आपण चर्चा करू. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी यांची एकत्रित बैठक ग्रंथालयांसमोर घेतली जाईल. या बैठकीत ग्रामीण भागातील ग्रंथालयांना येणाऱ्या अडचणी, समस्या संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. १९ नोव्हेंबरला ही बैठक घेण्याच्या दृष्टीने त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी जिल्हा ग्रंथालय संघाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, तसेच १२८ ग्रंथालयांना साहित्य वाटप तसेच विविध मार्गांनी सहकार्य केले जाईल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानी ही बाब आपण घालून ग्रंथालयांच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आपण पुस्तक संच भेट स्वरूपात देत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ग्रंथालय उभारणीसाठी पुस्तक संच भेट दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण यंदाच्या दिवाळीला एक अनोखा उपक्रम राबवला.
आपण अनेक अधिकारी वर्गांना खास पुस्तक संच भेट देऊन दिवाळी साजरी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ व्यापकतेने पुढे जाणे गरजेचे आहे, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








