
दोडामार्ग : धार्मिक श्रद्धा, आध्यात्मिक भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत साटेली-भेडशी येथील प. पू. समर्थ श्री राऊळ महाराज स्मारक मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला परिसरातील नागरिक, भाविक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ५०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. धार्मिक कार्यासोबतच समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संस्थानने राबविलेला हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.
सद्गुरू राऊळ महाराज संस्थान संचलित श्री प. पू. राऊळ महाराज स्मारक मंदिर, साटेली-भेडशी, श्री प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी आणि प्रा. डॉ. एस. एन. ओझा सर ट्रस्ट, पणजी (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. अनंत प्रभाकर सामंत (एम.डी. आयुर्वेद) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सुई न टोचता आरोग्य तपासणी हे शिबिराचे प्रमुख आकर्षण
या शिबिरातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुई न टोचता करण्यात आलेली आरोग्य तपासणी. मॅग्नेटिक अॅनालायझर मशीनच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करून एकाच वेळी शरीराच्या विविध स्थितींसंदर्भात ४९ प्रकारचे आरोग्य अहवाल उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याविषयी प्राथमिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.
याशिवाय मधुमेह (डायबिटीज) आणि युरिक अॅसिड तपासणीची विशेष मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी शहरांमध्ये जावे लागू नये, तसेच आर्थिक अडचणींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला.
वैद्यकीय पथकाचे मोलाचे योगदान...
या आरोग्य शिबिरामध्ये प्रा. डॉ. एस. एन. ओझा सर ट्रस्ट, पणजी (गोवा), अध्याय चिकित्सालय, पिंगुळी यांच्या सहकार्याने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. डॉ. अनंत प्रभाकर सामंत (एम.डी. आयुर्वेद), डॉ. आदित्य प्रकाश सामंत (बी.ए.एम.एस.) आणि डॉ. श्रुती लोखंडे (बी.ए.एम.एस.) यांनी आपल्या वैद्यकीय पथकासह उपस्थित राहून नागरिकांना आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी 'डिझायर फार्मा' आणि 'मेनकाइंड फार्मा लिमिटेड' यांचेही विशेष सहकार्य लाभले. या कंपन्यांचे प्रतिनिधी पराग आठले, राजेश धुरी आणि सोमनाथ कुडाळकर यांनी सहकार्य केले. तसेच विद्या सावंत, प्रणिता सडवेलकर, विनायक सावंत, प्रसाद दळवी आणि प्रकाश पिंगुळकर यांनीही शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष योगदान दिले.
या प्रसंगी सद्गुरू राऊळ महाराज संस्थानचे कार्याध्यक्ष विठोबा विनायक (अण्णा) राऊळ, उपकार्याध्यक्ष दशरथ विनायक (अण्णा) राऊळ, विश्वस्त अशोक विश्वनाथ कदम, अनिल भाई खवटे, प्रदीप पुंडलिक घाडीआमोणकर, विवेक पार्सेकर, महेश नामदेव धुरी आणि महेंद्र कुडकर यांच्यासह राजेंद्र म्हापसेकर व दादा देसाई उपस्थित होते. साटेली-भेडशी स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील भाविक भक्तांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

धार्मिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकीचा आदर्श...
श्री राऊळ महाराज स्मारक मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या आरोग्य शिबिरातून संस्थानने केवळ धार्मिक व आध्यात्मिक कार्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक आरोग्यसेवेची बांधिलकीही जपली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.
'निरोगी आरोग्यासाठी, एक पाऊल समाधानाकडे!' या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांच्या प्रयत्नांना मिळालेली पोचपावती ठरला. या उपक्रमाबद्दल परिसरातील ग्रामस्थ, नागरिक आणि भाविकांनी संस्थान व सर्व सहकारी संस्थांचे विशेष आभार व्यक्त केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








