LIVE UPDATES

ग्रामपंचायत अणसूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 19:27 PM
views 33  views

वेंगुर्ला : 'माझा गाव, आरोग्य संपन्न गाव' या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत अणसूर आणि लोक कल्प फाउंडेशन व सुयश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी तसेच लोक कल्प फाउंडेशन व सुयश हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक उपस्थित होते. या शिबिरादरम्यान गावातील सुमारे ३५ ग्रामस्थांनी व ज्येष्ठांनी आपली मोफत डोळे तपासणी करून घेतली. सुयश हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपस्थितांची नेत्रतपासणी करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय सल्ल्ले व औषधोपचार पुरवले.

या वेळी बोलताना सरपंच सत्यविजय गावडे म्हणाले, "ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आणि 'आरोग्य संपन्न गाव' ही संकल्पना साकारण्यासाठी ग्रामपंचायत अणसूर नेहमीच तत्पर आहे. लोक कल्प फाउंडेशन व सुयश हॉस्पिटलच्या या सहकार्यामुळे गावातील नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे." शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, लोक कल्प फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.