‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रिलीजच्या १३ दिवसांत ७५.०५ कोटी रुपयांची कमाई

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 16, 2026 13:24 PM
views 20  views

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा वेग कायम ठेवत मोठा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, रिलीजच्या अवघ्या १३ दिवसांत चित्रपटाने आपला संपूर्ण खर्च वसूल केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे ‘राजा शिवाजी’ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर वर्चस्व निर्माण केले. पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करत चित्रपटाने मोठ्या यशाचे संकेत दिले होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भव्य मांडणी आणि कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे.

कमाईबाबत बोलायचे झाल्यास, ‘राजा शिवाजी’ने पहिल्या आठवड्यात तब्बल ५२.६५ कोटी रुपये कमावले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने स्थिर कामगिरी केली. आठव्या दिवशी ३.२० कोटी, नवव्या दिवशी ५.६० कोटी, दहाव्या दिवशी ६.८० कोटी, अकराव्या दिवशी २.४० कोटी आणि बाराव्या दिवशी २.५० कोटींची कमाई झाली.

आता १३व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या बुधवारी चित्रपटाने सुमारे १.९० कोटी रुपयांची कमाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई आता ७५.०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, हा चित्रपट सुमारे ७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. त्यामुळे १३ दिवसांतच ‘राजा शिवाजी’ने आपला संपूर्ण खर्च वसूल केला असून आता हा चित्रपट ‘सेफ झोन’मध्ये पोहोचला आहे. म्हणजेच यापुढील कमाई थेट नफ्यात जमा होणार असल्याचे मानले जात आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणावर आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या दूरदृष्टीवर आधारित आहे. चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे.

चित्रपटात संजय दत्तने अफजल खानची भूमिका साकारली आहे, तर अभिषेक बच्चनने संभाजी शाहाजी महाराजांची भूमिका निभावली आहे. जेनेलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय सलमान खानचा जीवा महालाच्या भूमिकेतील खास कॅमिओही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.