LIVE UPDATES

Dodamarg News : दोडामार्गातील महावितरणच्या कारभाराविरोधात माजी नगराध्यक्ष संतोष नानचे आक्रमक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 23, 2026 20:00 PM
views 22  views

दोडामार्ग : महावितरणच्या कारभारावर आता माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे आणि नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी हल्लाबोल केला आहे. दोडामार्ग-आयी मार्गावरील धाटवाडी येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला दीड वर्षांच्या कालावधीत वीज वापरूनही बिलिंग झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत संताप व्यक्त केला. तसेच संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून वीज चोरी अथवा अनधिकृत वीजवापरास सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांकडून महावितरणचे झालेले नुकसान वसूल करून घ्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. 

महावितरण कार्यालयात विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब विचारताना नानचे आणि ठाकूर यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, संतोष हडीकर यांच्यासह अनेक नागरिक व ग्राहक उपस्थित होते.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी ग्राहकांनी कार्यालयात अथवा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तरी अनेकदा फोन उचलला जात नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. वीज कशामुळे गेली याची माहिती घेण्यासाठी फोन केला तरी फोन उचलला जात नाही. मग, ग्राहकांनी आपली समस्या कोणाकडे मांडायची ? असा सवाल नानचे आणि ठाकूर यांनी केला.

दोडामार्ग ते आयी मार्गावरील धाटवाडी येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी वीज कनेक्शन देण्यात आल्याचा मुद्दा नानचे आणि ठाकूर यांनी उपस्थित केला. गेल्या दीड वर्षांत या कनेक्शनचे किती बिल आकारण्यात आले? किती वीज वापरली गेली? मीटर रीडिंग काय आहे? बिलांची नोंद कुठे आहे? असे सवाल त्यांनी केले. गेल्या दीड वर्षात एकदाही बिल दिले आहे का? दिले असेल तर दाखवा, अशी विचारणा करण्यात आली असता संबंधित अधिकाऱ्यांना बिल दाखवता आले नाही.

यावेळी शाखा अभियंता पराग शिरधनकर यांनी ‘बिल दिले नाही, ही आपली चूक झाली,’ असे सांगितल्याचे नानचे आणि ठाकूर यांनी नमूद केले. बिलिंगमध्ये त्रुटी झाल्याचे स्पष्ट झाले तर महावितरणचे संभाव्य आर्थिक नुकसान नेमके कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाले, याची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. 

तसेच महावितरणच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवताना नानचे आणि ठाकूर यांनी म्हटले की, गरीब ग्राहकांचे काही बिल थकले तरी कनेक्शन तोडण्याची तत्परता दाखवली जाते. मग बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वीजवापराबाबत दीड वर्षे बिलच नसेल तर ही तत्परता कुठे गेली ? गोरगरीबांना एक न्याय आणि बिल्डरांना एक न्याय, हा प्रकार चालणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. महावितरणने सर्व ग्राहकांना समान नियम लागू करावेत आणि कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक किंवा सामाजिक प्रभावानुसार वेगळे निकष ठेवू नयेत, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणात अनधिकृत वीजवापर अथवा वीज चोरीस सहकार्य झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतोष नानचे आणि रामचंद्र ठाकूर यांनी केली. शाखा अभियंत्यांनी वीज चोरीस किंवा अनधिकृत वीजवापरास सहकार्य केले असल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

पडवे-माजगावचा प्रश्नही ऐरणीवर

यावेळी पडवे-माजगाव येथील नागरिकांच्या खासगी जमिनीतील झाडे तोडून पोल उभारल्याचा मुद्दाही संतोष नानचे आणि रामचंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला. एका ठेकेदाराकडून खासगी जमिनीतील झाडे तोडण्यात आली असून, त्यानंतर पोल उभारण्यात आले; मात्र संबंधित जमीनमालकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या खासगी जमिनीतील झाडे तोडली, पोल उभारले मात्र झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा सवाल करत संबंधितांना तातडीने न्याय देण्याची मागणी नानचे यांनी केली.

दरम्यान, या सर्व प्रश्नांवर उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंखे यांनी प्रकरणाची दखल घेतली. आपण स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करणार असून, वस्तुस्थिती तपासून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वाढीव अथवा चुकीच्या वीजबिलांबाबतही तक्रारी आल्याने संबंधित बिले तपासून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे साळुंखे यांनी सांगितले. तर या प्रकरणाबाबत पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता आपल्याकडे प्रतिक्रिया देण्याची पॉवर नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.