
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित तीन दिवशीय ''असंघटित लोककलांचा महोत्सव'' आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव असंघटित लोककलांचा महोत्सवाला शुक्रवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.
येथील बॅ. नाथ पै सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून २२, २३ व २४ मे या तीन दिवसांकरीता या असंघटित लोककलांचा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी नाट्य दिग्दर्शक, अभिनेते गणेश ठाकूर, अभिनेत्री सोनल लेले, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, प्रा. डॉ. एन डी कार्वेकर, आर्यन देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. आजच्या डिजीटल युगात प्रेक्षक चांगल्या कार्यक्रमांना येत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असंघटित लोककलांचा महोत्सव ही श्रोत्यांसाठी मेजवानी असून लुप्त झालेल्या लोककला पाहण्याची ही संधी आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शुक्रवारी करपल्लवी गोंधळी, बहुरुपी, धनगरी ओवी, हेळवी लोककलावंत, फुगडी आणि झिम्मा आदी लुप्त होत चाललेल्या लोककला सादर करण्यात आल्या. तसेच शनिवारी आदिवासी पाटा गायन, खेळे कळसूत्री बाहुल्यांचा, धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लैंगी बंजारा नृत्य, रविवारी कोकणची लोककला परंपरा समृद्ध करणारे दशावतार नाटक, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, दिमडी, ढोलकी, ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदी आणि भारुड यांसारख्या प्रसिद्ध कलाप्रकारांसह लोककलांचे सादरीकरण प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.














