
देवगड : कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या पारंपरिक दशावतार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाचा दशावतार नाट्य महोत्सव देवगड येथे आयोजित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवासाठी देवगडची निवड करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, महोत्सवात पारंपरिक दशावतार मंडळांना ५० टक्के सहभाग व वाटा देण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.
मूळ नऊ पारंपरिक दशावतार मंडळ शिखर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दशावतार कलेचे जतन, संवर्धन, कलाकारांचे प्रश्न आणि या कलेच्या भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारा यंदाचा दशावतार नाट्य महोत्सव देवगड येथे आयोजित करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. देवगडला लाभलेला पर्यटनाचा वारसा आणि दशावतार कलेशी असलेले कोकणचे सांस्कृतिक नाते लक्षात घेता येथे महोत्सवाचे आयोजन व्हावे, अशी भूमिका मांडण्यात आली. त्याचबरोबर महोत्सवाच्या आयोजनामध्ये पारंपरिक दशावतार मंडळांना ५० टक्के सहभाग व वाटा मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
संचालक प्रशांत खेडेकर आणि उपसंचालक संदीप बलखंडे यांनी या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता दिली. त्यामुळे यंदाचा दशावतार नाट्य महोत्सव देवगडमध्ये आयोजित होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पारंपरिक दशावतार मंडळांच्या सहभागाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे मंडळांचे मालक, पदाधिकारी आणि कलाकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बैठकीत दशावतार मंडळांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, कलाकारांचे हक्क, मंडळांच्या समस्या तसेच या पारंपरिक लोककलेचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दशावतार ही केवळ मनोरंजनाची कला नसून कोकणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या कलेच्या संवर्धनासाठी शासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या भेटीप्रसंगी मूळ नऊ पारंपरिक दशावतार मंडळ शिखर संघाचे अध्यक्ष सुधाकर दळवी, सचिव सौरभ पाटकर आणि कार्यकारिणी सदस्य बाबा मेस्त्री उपस्थित होते. पारंपरिक दशावतार मंडळांना महोत्सवात ५० टक्के सहभागाची संधी मिळणार असल्याने या कलेशी संबंधित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. देवगड येथे महोत्सवाचे आयोजन झाल्यास स्थानिक पर्यटनालाही चालना मिळण्याबरोबरच दशावतार कलेचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








