गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 02, 2026 20:26 PM
views 274  views

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी परिसरातील वरची कुंभारवाडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला कुडाळ पोलिसांनी रंगेहात पकडल्यानंतर, त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील संशयित आरोपीला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुडाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील कुंभारवाडी येथे गांजाची विक्री होणार होती. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून शुभम संदीप परब (वय २३, रा. कुडाळेश्वरवाडी) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

संशयित आरोपीची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हा गांजा कोठून आणला गेला? या विक्रीमागे आणखी कोणाचे हात आहेत? आणि जिल्ह्यात गांजा पुरवठ्याचे मोठे जाळे सक्रिय आहे का? या दिशेने कुडाळ पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.

या कारवाईमुळे कुडाळ परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.