LIVE UPDATES

...तर कुडाळहून गोव्यात येणारी वाळू बंद करणार

पेडणे बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनचा इशारा : आमदार आर्लेकर यांची घेतली भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 21:01 PM
views 47  views

पणजी : गोव्यातील वाळू व्यवसाय १ ऑगस्टपर्यंत सुरू करावा, अन्यथा कुडाळहून गोव्यात येणारी वाळू दोन महिने बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा पेडणे बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनने दिला आहे. १ ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत गोव्याबाहेरून होणारी वाळू वाहतूक पू्र्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे व त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे. 

यासंदर्भात वाळू व्यावसायिक आणि डंपर चालकांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांची भेट घेऊन स्थानिक वाळू व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन दिले. या निवेदनात वरील इशारा देण्यात आला आहे. आमदार आर्लेकर यांनी स्थानिक व्यवसाय पुन्हा सुरू करणार असल्याचे आश्वासन व्यावसायिकांना दिले आहे. ३० सप्टेंबर नंतर गोवा व महाराष्ट्र ट्रक संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत होणारी चर्चा व परस्पर संमतीने वाळू वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

असो‌‌सिएशनने घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन करून वाळू वाहतू्क केल्यास संबंधित वाहनावर शासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्यास पेडणे बार्देश ट्रक मालक संघटना जबाबदार राहणार नसल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेटये यांनी दिली.