LIVE UPDATES

गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाच्या आवळल्या मुसक्या !

५३६ ग्रॅम गांजासह ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 01, 2026 18:51 PM
views 1649  views

कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. कुडाळ एमआयडीसी परिसरातील वरची कुंभारवाडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला कुडाळ पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शुभम संदीप परब (रा. कुडाळेश्वरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 १ एप्रिल २०२६ रोजी महत्त्वाची माहिती मिळाली. पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कुंभारवाडी येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीची शहानिशा करून पोलीस निरीक्षक मगदूम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचला आणि संशयित शुभम परब याला ताब्यात घेतले.

जप्त केलेला मुद्देमाल 

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे ५३६ ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत २६,८०० रुपये) आढळून आला. याशिवाय पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

दोन धारदार चाकू, रोख रक्कम ३,८७० रुपये, डिजिटल वजन काटा, गांजा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र, असा एकूण ३८,२७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

जिल्ह्यात तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलीस दल सतर्क झाले आहे. "कुणीही अंमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्या, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल," असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले आहे. अटक केलेल्या संशयिताला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, उपनिरीक्षक सचिन अवताडे, प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, संजय कदम, सचिन गवस, समीर बांदेकर, रुपेश गवस आणि विष्णू रामदास यांच्या पथकाने केली.