
वेंगुर्ला : दाभोली गावात दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेल्या महिलांनीच आज मंगळवारी गावचे सरपंच उदय गोवेकर, माजी सरपंच एकनाथ राऊळ आणि पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर यांचे सहकार्य घेत दाभोली-ख्रिश्चनवाडी येथील शेतमळ्यात विक्रीच्या उद्देशाने ठेवलेल्या दारुसाठ्यावर धाड टाकली. त्याठिकाणी सापडलेल्या गोवा बनावटीच्या दारूबाबत पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिस यंत्रणाही तत्काळ दाखल होत पंचयादी करून तो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दाभोली गावामध्ये गेली कित्येक वर्षे अवैध दारूविक्री चालू होती. ही दारू विक्री बंद होण्यासाठी थेट महिलांनीच पुढाकार घेतला. तसेच अलिकडेच दाभोली गावातील महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन या सभेत महिलांनी एकजुटीने आणि एकमताने दारूबंदीसाठी ठराव केला होता. याबाबतचे लेखी निवेदनही वेंगुर्ला पोलिस स्टेशनला देण्यात आले होते. दाभोली गावात दारूबंदीबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास वरिष्ठपातळीवर दाद मागण्यात येईल. तसेच प्रसंगी आंदोलनही छेडण्यात येईल असे त्या निवेदनात नमूद केले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने गेले चार ते पाच दिवस वेंगुर्ला पोलिसांनी दाभोली गावात गस्त सुरू ठेवली होती.
दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ख्रिश्चनवाडी नजिकच्या शेतमळ्यात अज्ञाताने दारूसाठा ठेवला असल्याची गोपनीय माहिती महिलांना मिळाली. त्यानुसार दहा ते बारा महिलांनी एकत्र येत संबंधित ठिकाणी पाहणी केली असता त्याठिकाणी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती महिलांनी गावचे सरपंच उदय गोवेकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ आणि पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर यांना दिली. त्यानुसार ते तत्काळा घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून वेंगुर्ला पोलिसांना याची खबर देण्यात आली. त्यानुसार वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे वाहतुक पोलिस मनोज परूळेकर, गोपनिय विभागाचे पोलिस प्रथमेश पालकर आणि महिला पोलिस संध्या गुरव या टीमने घटनास्थळी भेट दिली. या घटनेच्या पंचनाम्याची कार्यवाही करून गोवा बनावटीचा सापडलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.














