LIVE UPDATES

फोंडाघाटमध्ये पत्नीवर ७० हजारांचा ऐवज चोरल्याचा आरोप

पत्नीविरोधात कणकवली पोलिसांत पतीची तक्रार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 20:17 PM
views 22  views

कणकवली : आपल्या पत्‍नीने शुक्रवारी रात्री ८ वा. च्या सुमारास आपल्या घरी नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथे येवून आपल्‍या व आईच्या संमतीशिवाय रोख रक्‍कम ५५ हजार आणि १५ हजाराची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा मिळून ७० हजाराचा ऐवज चोरून नेला तसेच आपणास व आई वडीलांना शिवीगाळ केली अशी तक्रार जयेंद्र लक्ष्मण चव्हाण (३२, रा. नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट) यांनी कणकवली पोलिसात दिली. त्‍यानूसार संशयित जान्हवी उर्फ राधिका महादेव चव्हाण (सध्या रा. धामोड, ता. राधानगरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीनूसार ते गवंडी काम करतात. १९ मे २०२६ रोजी त्‍यांचा विवाह धामोड राधानगरी येथील राधिका महादेव चव्हाण हिच्यासोबत झाला होता. लग्‍नानंतर काही महिन्यांनी त्‍यांच्यात वाद सुरू झाले. त्‍यातून पत्‍नी जान्हवी हिने गणेश चतुर्थीच्या अगोदर तीन दिवस घर साफसफाई करण्यावरून वाद करून परत नांदायला येणार नाही असे सांगून भांडण करून ती माहेरी गेली.

त्‍यानंतर तिने संपर्क केला नाही. शुक्रवारी २ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास ती ओळखीच्या नातेवाईकांना घेवून घरी आली. कोणालाही न विचारता कपडे व घरातील कपाटातील सामान बॅगेत भरले, जाताना आईवडीलांना शिवीगाळ केली आणि रात्री ८ वा. च्या सुमारास कपड्याची बॅग घेवून निघून गेली.

त्‍यानंतर काही वेळाने जयेंद्र यांच्या आई सुभद्रा हिने कपाटात ठेवलेली सोन्याची अंगठी व रोख रक्‍कम पाहिली असता ती दिसून आलेली नाही. त्‍यामुळे ती पत्‍नी जान्हवी हिने चोरून नेल्‍याची तक्रार जयेंद्र चव्हाण यांनी कणकवली पोलिसात केली. त्‍यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.