LIVE UPDATES

Vengurla Water Conservation : विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा

ग्रामस्थांच्या श्रमदानातून मातोंडमध्ये उभारला वनराई बंधारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 20:48 PM
views 51  views

वेंगुर्ला : आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केलेल्या विशाल परब यांच्या पुढाकारातून वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.

यावेळी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न ऊर्फ बाळू देसाई, नगरसेवक सचिन शेटये, भाजपचे मातोंड गावातील पदाधिकारी ताता मेस्त्री, अनिल परब, माजी उपसरपंच आनंद परब, दत्ता धुरी, नंदकिशोर परब, विकास परब, बबीता कोंडूसकर, रवी मातोंडकर, आनंद मातोंडकर, महेश मातोंडकर, रूपक मातोंडकर, सत्यवान परब, प्रवीण गुरव, प्राची गुरव, प्रभावती घाडी, संता परब यांच्यासह महिला क्रांती ग्रामसंघ मातोंडच्या महिला, रवळनाथ शेतकरी गट, मातोंड गावठणवाडी शेतकरी गटातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विशाल परब यांनी वाढदिवसाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंवर्धनाच्या कार्याला समर्पित करण्याचा संकल्प केला आहे. आगामी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे आणि भूजलपातळी टिकून राहावी, या उद्देशाने सावंतवाडी-विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

याच उपक्रमांतर्गत मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांनी एकत्र येत सकाळपासून वनराई बंधारा उभारण्याचे काम केले. विशेष म्हणजे या कामात महिला व शेतकरी वर्गानेही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. श्रमदानातून उभारलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याचा साठा वाढण्यास तसेच आजूबाजूच्या विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होणार असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

यावेळी बोलताना विशाल परब यांनी ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसहभागाची एक नवी चळवळ उभी राहत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठे कार्यक्रम न करता गावागावांत प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाची कामे करण्याचे आवाहन केले असून त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही केवळ बांधारा उभारण्याची गोष्ट नाही, तर गावागावांतून उभी राहणारी एक मोठी जलचळवळ आहे,” असे विशाल परब यांनी सांगितले.

आज जिल्ह्यात विविध ठिकाणी अशाच प्रकारे वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरू झाले असून, ही संख्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “एखाद्या बुकेऐवजी सिमेंटची गोणी स्वीकारली किंवा पोस्टर लावण्याऐवजी पाण्याचा साठा निर्माण केला, तर त्याचा फायदा भविष्यातील पिढ्यांना होईल. आजची गरज ओळखून आपण जलसंधारणाकडे वळणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशाल परब यांच्या या उपक्रमाला शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.