LIVE UPDATES

मुर्तवडे धनगरवाडीचा दोन वर्षांपासून प्रलंबित पाणीप्रश्न अखेर मार्गी

जि.प. सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; ठेकेदाराकडून तात्काळ बोअरवेलची दुरुस्ती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 19:55 PM
views 18  views

चिपळूण : वहाळ जिल्हा परिषद गटातील मुर्तवडे धनगरवाडी येथील गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीदरम्यान मुर्तवडे धनगरवाडीतील ग्रामस्थांनी पत्राद्वारे आपली व्यथा मांडत पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. बोअरवेलमधून पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांचे पत्र प्राप्त होताच शिवानी सावंत यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला.

यानंतर स्थायी समितीच्या बैठकीतही हा विषय मांडत शिवानी सावंत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. विषयाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी मुर्तवडे धनगरवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर ठेकेदारामार्फत बोअरवेलची आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न आता मार्गी लागला असून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध झाले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “प्रभाग समितीच्या बैठकीत आमची व्यथा मांडल्यानंतर शिवानी मॅडम यांनी विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले. केवळ आश्वासन न देता संबंधित विभागाशी पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी आणले.

सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची त्यांची कार्यपद्धती आम्हाला जाणवली. आमच्या वाडीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे त्यांनी संवेदनशीलतेने पाहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असे ग्रामस्थांनी सांगितले.