LIVE UPDATES

Ratnagiri News : तीन घरफोड्या, लाखोंचा ऐवज अन् आरोपी गजाआड

नाटे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 17:24 PM
views 54  views
Nate Police solve three house-breaking cases and recover stolen jewellery and cash in Ratnagiri

राजापूर : तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बंद घरे फोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाटे पोलिसांना मोठे यश आले आहे. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या भालावली, नाटे आणि नाणार येथील तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी संबंधित आरोपींना वेगवेगळ्या कारवाईत जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकापाठोपाठ घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन नाटे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.

भालावली येथील घरफोडी

भालावली, वरचा भंडारवाडा येथील शेतकरी विश्वास महादेव भोसले हे घर बंद करून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराची कडी काढून आत प्रवेश केला. कपाटातील सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चपटी चैन चोरून नेण्यात आली होती.

नाटे येथील घरफोडी 

नाटे येथील ‘यश होम स्टे’च्या पाठीमागे राहणारे सुपरवायझर रोशन मोठाभाऊ बच्छाव हे कामावर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या भाड्याच्या घराचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याची गोफ चैन, अंगठी, चांदीचे दागिने तसेच ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील एक लाख रुपये रोख, असा एकूण सुमारे २ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता.

नाणार येथील घरफोडीचा छडाही लावला 

नाणार भटवाडी येथील सेवानिवृत्त सिस्टर लता वासुदेव साईम या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना त्यांच्या घराचे मुख्य कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून चांदीची पूजेची भांडी व अन्य साहित्य लंपास केले होते.

या तिन्ही घटनांचा समांतर तपास करताना नाटे पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. नाणार येथील घरफोडीप्रकरणी बीड जिल्ह्यातील कासारी, ता. आष्टी येथील संजय उर्फ मोहन निकाजा भोसले आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निखिल माने करीत आहेत.

दरम्यान, भालावली आणि नाटे येथील घरफोडीच्या गुन्ह्यांचाही पोलिसांनी माग काढून संबंधित आरोपींना गजाआड केले आहे. तिन्ही प्रकरणांतील आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही धडक कारवाई रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत या तीनही गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला.

एकापाठोपाठ घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना जेरबंद करून नागरिकांचा चोरीस गेलेला ऐवज परत मिळवून देण्यात नाटे पोलिसांना आलेले यश उल्लेखनीय मानले जात असून, त्यांच्या या कामगिरीचे राजापूर परिसरासह जिल्ह्यातून कौतुक होत आहे.