
दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष अनुपस्थित असताना सत्ताधारी नगरसेवकांकडून सत्ताधारी नगरसेवकांवर आरोप प्रत्यारोप केल्यानंतर दोडामार्गचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे दोडामार्ग गटनेते तथा नगरसेवक नितीन मणेरीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, नगरसेवक रामचंद्र ठाकूर व राजेश प्रसादी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमांना उपस्थित न राहणारे हे तीन नगरसेवक डुप्लिकेट नगरसेवक आहेत असा थेट आरोप करत मणेरीकर यांनी बांधकाम परवानग्या, कथित आर्थिक व्यवहार, अनधिकृत बांधकामे, एम-सँड प्रकरणातील २५ लाखांचा आरोप आणि नगरपंचायतीच्या पूर्वीच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आणि योग्य वेळी कायदेशीर मार्गाने तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
स्नेह रेसिडेन्सी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नितीन मणेरीकर बोलत होते. त्यावेळी त्यांनी संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर व राजेश प्रसादी यांचा उल्लेख करत हे तिघे भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याचा दावा केला. त्यामुळे आपण त्यांना ‘डुप्लिकेट नगरसेवक’ संबोधत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तिघांमध्ये पहिल्या क्रमांकावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, दुसऱ्या क्रमांकावर रामचंद्र ठाकूर आणि तिसऱ्या क्रमांकावर राजेश प्रसादी असा उल्लेख करत मणेरीकर यांनी या नगरसेवकांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बांधकामाची टेप घेऊन मी स्वतः दाखवतो...
मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. दोडामार्ग येथे आपण सदनिका बांधण्याचे काम हाती घेतले असून, त्याबाबत ३० मीटर अंतराचा नियम पाळला नसल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत असल्याचे मणेरीकर यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्रातील नियमांची मला माहिती आहे. माझ्या बांधकामाबाबत कोणाला शंका असेल तर अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन टेपने मोजणी करावी. एक इंच जरी तफावत आढळली, तर माझ्या बांधकामाची परवानगी नाकारावी,” असे आव्हान त्यांनी दिले. आपल्याला नाहक त्रास देण्यासाठी चुकीचे अर्ज, उपोषणाच्या धमक्या आणि विविध प्रकारच्या दबावाचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मला नंतर भेटा म्हणजे काय?
बांधकाम परवानग्यांच्या नावाखाली दबावाचे राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोप मणेरीकर यांनी केला. तुम्हाला त्रास नको असेल तर आम्हाला येऊन भेटा, अशा प्रकारचे निरोप दिले जातात. भेटा म्हणजे नक्की कशासाठी भेटायचे? बांधकामाची परवानगी मिळवून देतो, सर्व मी बघतो आणि त्याच्या बदल्यात फ्लॅट किंवा गाळा द्या, अशी पद्धत असल्याचे सांगितले जाते असा आरोप मणेरीकर यांनी केला. या आरोपांची संबंधितांनी चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.
एम-सँडच्या २५ लाखांच्या आरोपावरून खडाजंगी
एम-सँडच्या विषयात नगरपंचायतीच्या बॉडीतील एकाही नगरसेवकाने 25 लाख नाही तर 25 रुपये ही घेतले नाही असा दावा मणेरीकर यांनी केला. २५ लाख रुपये कोणी घेतले, हे आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करून दाखवावे. आरोप सिद्ध झाले तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे आव्हान त्यांनी दिले. उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी २५ लाख रुपयांच्या कथित व्यवहाराचा आरोप केला असल्याच्या पार्श्वभूमीवर मणेरीकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. एम-सँडला कोणाच्या कारकिर्दीत परवानगी देण्यात आली, याचीही चौकशी करा. चौकशी झाली तर वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल असे ते म्हणाले.
बोलविता धनी कोण?
उपनगराध्यक्ष देविदास गवस यांच्या भूमिकेबाबत बोलताना मणेरीकर यांनी त्यांचा ‘बोलविता धनी’ दुसराच असल्याचा आरोप केला. पत्रकारांनी जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीचा बोलविता धनी कोण असू शकतो असा सवाल केला असता तो कोण आहे, हे येणाऱ्या काळात आपण पुढे आणू, असे मणेरीकर म्हणाले.
कमिशनच्या जीवावर जगताता...
नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या कामांवर आपण लक्ष ठेवत असल्याचे स्पष्ट करत मणेरीकर म्हणाले की, आपण सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून कोणाच्याही नावाखाली काम करत नाही. मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर असल्याने कामाच्या ठिकाणी जाऊन कामाचा दर्जा तपासतो. शासनाच्या नियमांनुसार आणि चांगल्या दर्जाचे काम करून घेण्याचा प्रयत्न करतो. तळ्याचे काम, पिंपळेश्वर चौकातील सुशोभीकरण यांसह विविध कामे चांगल्या पद्धतीने करून घेतल्याचा दावाही त्यांनी केला. कुठे कमिशन मिळेल का, याकडे काहींचे लक्ष असते. आम्ही चांगले काम करत आहोत, हे काहींना पाहवत नाही. त्यामुळेच बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असा आरोप मणेरीकर यांनी केला.
माजी नगराध्यक्षांच्या कारभारावरही तोफ डागली...
आपल्यावर आरोप करणाऱ्या माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळावरही नितीन मणेरीकर यांनी जोरदार टीका केली. त्यांच्या कारकिर्दीत किती भ्रष्टाचार झाला, हे दोडामार्गच्या जनतेला माहिती आहे. नगरपंचायतीमार्फत झालेल्या विविध वस्तूंच्या खरेदीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपण यापूर्वीही केला होता असे ते म्हणाले. मात्र, या आरोपांबाबत पत्रकारांनी पूर्वी संबंधितांना क्लीन चिट मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो असे मणेरीकर यांनी स्पष्ट केले.
एका रात्रीत ३०० हुन अधिक असेसमेंट?
नगरपंचायतीच्या निर्मितीच्या काळातील कारभारावरही मणेरीकर यांनी प्रश्न उपस्थित केला. नगरपंचायतीच्या स्थापनेच्या शेवटच्या रात्री सुमारे ३०० असेसमेंट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाचीही चौकशी होऊन नेमके काय झाले होते, हे समोर यावे, अशी मागणी त्यांनी केली.
स्वतःचा आरसा पाहावा
त्यांच्या कार्यकाळातही अनेक निकृष्ट कामे झाली आहेत. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा आरसा पाहावा,” असा टोला मणेरीकर यांनी लगावला. शहरातील नागरिक आणि वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक होत असल्याचा दावा करत, काहींच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळेच माझ्यावर आणि आमच्या नगरपंचायतीच्या कामावर आरोप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी सांगितले.













