LIVE UPDATES

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

आमदार दीपक केसरकर शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसान झालेल्या भातशेतीची केली पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 19:39 PM
views 62  views

वेंगुर्ला : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी भाताला कणसेच आलेली नाहीत. काही ठिकाणी कणसे आली असली तरी त्यामध्ये भाताचे दाणे तयार झालेले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा, तुळस, मातोंड, होडावडा आदी भागात प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली.

यावेळी आमदार केसरकर यांनी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी तसेच तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील भातशेतीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नुकसानग्रस्त क्षेत्र, पिकांची अवस्था तसेच शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणींबाबत त्यांनी माहिती घेतली.

यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले, “यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तहसीलदारांनी ठरवलेल्या कार्यक्रमानुसार आवश्यक पंचनामे व इतर कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान शासनाच्या निदर्शनास आणून देऊन, शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई शेतकऱ्यांना कशी मिळवून देता येईल, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असेही आमदार केसरकर यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, साक्षी नार्वेकर, सुचिता वजराटकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शहरप्रमुख अजित राऊळ, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, उमेश नाईक, पाल सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, सचिन नाईक, शिवसेना विभागप्रमुख संजय परब, रामू परब, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, माजी उपसरपंच आनंद परब, सुभाष सावंत, ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, राहुल प्रभू, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश परब, रविकिरण परब, सिताराम नाथ, जयवंत परब, राजन पैलाडकर, गीता सावंत, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उपसरपंच राजबा सावंत, मंडळ अधिकारी प्रेरणा गिरप, रवी केळुसकर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भातशेतीची वस्तुस्थिती नोंदवून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीलाही यावेळी गती देण्यात आली.