
कणकवली : जानवली पुलानजीक एका स्टॉलवर अवैध गुटखा विक्रीची माहिती मिळाल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे एक हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी स्टॉलधारक आणि गुटखा पुरवणारा अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी स्टॉलधारक संशयित केतन राजेंद्र देऊलकर( 28 रा.तरंदळे-कुंदेवाडी) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ही कारवाई गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली.
सिंधुदुर्गच्या अन्नसुरक्षा अधिकारी तेजश्री नाचणे यांनी याबाबतची फिर्याद दिली. तर गुटखा पुरवणारा संशयित सतीश उर्फ शक्ती देवर (रा. वरवडे) हा पोलिसांना मिळालेला नाही. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील करत आहेत.














