
सिंधुदुर्गनगरी : कसाल बाजारपेठ येथील जीवन शिक्षण मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या स्वच्छतागृहालगत बसवण्यात आलेल्या वॉश बेसिनची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवार, दिनांक १३ रोजी दुपारी १२ ते सोमवार, दिनांक १५ रोजी सकाळी १० या कालावधीत घडल्याचा अंदाज आहे.
शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी शाळा बंद करून घरी परतले होते. सोमवारी सकाळी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक आले असता, शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहाच्या बाहेर बसवलेल्या दोन वॉश बेसिनपैकी एका बेसिनची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, कसालचे सरपंच राजन परब, नंदू आंबेरकर, साई आंबेरकर आदींनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत संबंधित वॉश बेसिन अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक तोडल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत. शाळेच्या मालमत्तेची तोडफोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.














