LIVE UPDATES

देवगड तारामुंबरी नाक्यावर दोन गटांत तुफान राडा

Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 28, 2026 23:12 PM
views 141  views

देवगड : तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या तारामुंबरी नाक्यावर सायंकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पवनचक्कीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून वाहन बाजूला घेणे आणि मागे कोण घेणार ? यावरून सुरू झालेला किरकोळ वाद पुढे चांगलाच पेटला. त्याचे रूपांतर थेट दोन गटांतील तुफान राड्यात झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटनासाठी आलेल्या काही वाहनांसह स्थानिक नागरिकांची वाहने एकाचवेळी अरुंद मार्गावर समोरासमोर आल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. यावेळी वाहन बाजूला घेण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला केवळ वादापुरती मर्यादित असलेली ही घटना काही वेळातच आक्रमक वळणावर गेली. दोन्ही गटांतील काही युवकांमध्ये धक्काबुक्की, मारामारी सुरू झाली.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने परिस्थिती आणखी चिघळली. या गोंधळात एका वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जमावाचा आक्रमक पवित्रा पाहता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून बंदोबस्त वाढविला. पोलीस निरीक्षक बुवा हे अतिरिक्त पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत केले. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित काही जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे समजते. दरम्यान, पर्यटनस्थळी वाढती गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.