ग्रामस्थांनी केला बिअर बारला विरोध

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 22, 2026 19:54 PM
views 54  views

कणकवली : कलमठ जि. प. बाजारपेठ शाळा नंबर १ परिसरात एका इमारतीच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये बिअर बार सुरू होत आहे. बार सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जागेची पाहण्यासाठी बुधवारी सकाळी कलमठ दाखल झाले होते. मात्र, बारला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. उत्पादन शुल्य कायद्यांतर्गत लागू असलेल्या नियमांचे तसेच सार्वजनिक हित, कायदा व सुव्यवस्था यांचा विचार करून बारला परवानगी मंजूर करू नये, अशा मागणीची निवेदन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिले. दरम्यान, याठिकाणी बार सुरू झाल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी दिला.


कलमठ-बाजारपेठ येथे परिसरात एका इमारतीच्या व्यावसायिक गाळ्यासाठी एका व्यक्तीने बिअर बार सुरू करण्याबाबत संबंधित विभागाकडून परवानगी घेतली आहे. ही बाब ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी बारच्या विरोधात आवाज उठवला होता. बार सुरू करण्यास परवानगी देऊ नये, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही अद्यापही झाली. राजू कोरगावकर यांनी बारविरोधात ग्रा. पं. कार्यालयासमोर उपोषण देखील केल होते.


बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नितीन शिंदे व अन्य कर्मचारी त्या जागेची पाहणी करण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी बारला विरोध करीत बार सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी केली. यावेळी ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, किरण हुन्नरे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, सुशांत राऊळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बिअर बारला परवानगी देऊ नये, अशा आशयाचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 


निवेदनावर प्रकाश कोरगावकर, पूजा कोरगावकर, नंदकिशोर नाटेकर, लक्ष्मी पारकर, पूर्वा पारकर, अर्पिता तोरसकर, गौरी साळकर, गोविंद साळकर, सृष्टी बेलवलकर, रोहित हजारे, रमेश पावसकर, दत्तात्रय पांगम, सुशांत राऊळ, विनायक मेस्त्री, सूर्यकांत हुन्नरे, नितीन मेस्त्री, भूषण ठाकूर, संजय बेलवलकर, हर्ष हजारे, सुनील कोरगावकर, विठ्ठल कांबळी, नील लोकरे, राजू पेंडुरकर, समीर कांबळी, विजय कांबळी, किरण हुन्नरे, शशिकांत कांबळे, मंथन हजारे, बाळकृष्ण कोरगावकर, प्रसाद कांबळी, राजू कोरगावकर, कांचन साखरे यांच्या सह्या आहेत.