
वैभववाडी : ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरीचे आमिष दाखवून तालुक्यातील एका शिक्षित तरुणाची १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाने सायबर विभागाकडे तक्रार नोंदविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीच्या शोधात असलेल्या या तरुणाच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. ‘व्यापारी प्रमोशन टीम’मध्ये घरबसल्या कामासाठी शिक्षित तरुणाची गरज असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीकडून केवळ २०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. तरुणाने २०० रुपये भरल्यानंतर त्याला ३०० रुपये परत मिळाल्याने त्याचा विश्वास बसला.यानंतर कंपनीकडून ५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. तरुणाने यूपीआयद्वारे ५ हजार रुपये भरले. मोबदल्याची मागणी केल्यावर कंपनीने पुन्हा १० हजार रुपये भरण्याची अट घातली.
अशा प्रकारे तरुणाने एकूण १५ हजार रुपये जमा केले. या बदल्यात त्याला २१ हजार ६९९ रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.मात्र, रक्कम परत मागितल्यानंतर कंपनीने पुन्हा ३० हजार रुपये भरण्याची मागणी केली. यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणाने तात्काळ सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधून संबंधित कंपनीविरोधात तक्रार दाखल केली.दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून शासनाकडून जनजागृती केली जात आहे. तरीदेखील नोकरी व झटपट पैसे मिळविण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अशा संदेशांना बळी न पडता खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.














