
वैभववाडी : वैभववाडीत ठेकेदारांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील एका शासकीय कार्यालयासमोर आज सकाळी हॉटमिक्सच्या कामावरून दोन ठेकेदारांमध्ये जोरदार खडाजंगी आणि हाणामारीचा प्रकार घडला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यापूर्वीही ठेकेदारांमधील वादाचा प्रकार घडला असताना आज पुन्हा तसाच प्रकार घडल्याने वैभववाडीत चर्चेला उधाण आले आहे.हे दोन्ही ठेकेदार एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.
वैभववाडी तालुक्यात विकासकामांच्या निविदा आणि ठेकेदारीवरून यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका घाटातील कामांवरून ठेकेदारांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आता हॉटमिक्सच्या कामावरून पुन्हा ठेकेदार आमनेसामने आले आहेत. शासकीय कार्यालयाच्या परिसरातच हा प्रकार घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विकासकामे करण्यासाठी असलेल्या ठेकेदारांमध्येच अशा प्रकारे वाद आणि हाणामारी होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमका कोणता आदर्श घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालयाच्या परिसरात घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, या चित्रफितीतून नेमका प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.
ठेकेदारीच्या वादातून पुन्हा एकदा वैभववाडीची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली असून, या प्रकारावर प्रशासन व त्या पक्षाचे नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








