
दोडामार्ग : साटेली भेडशी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे 3 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करत चोरट्याने पोबारा काढला. त्यात 2 लाख 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 55 हजार तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची फिर्याद आशेसाव शालू रॉड्रिग्स यांनी पोलिसांत दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला गजाआड करण्याची मागणी केली जात आहे.
साटेली वरचीवाडी येथील आशेसाव शालू रॉड्रिग्स यांच्या भावाच्या घरात ही घरफोडी झाली. त्यांचा भाऊ रोमाल शिलोरियान फर्नांडिस हे कामानिमित्त गोवा राज्यात असतात. त्यामुळे त्यांचे घर सहसा बंद असते. आशेसाव या लागतच्या घरात झोपण्यासाठी गेल्या होत्या. रविवारी रात्रीच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटांची झडती घेत त्यांनी सुमारे 2 लाख 52 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, व रोख 55 हजार रक्कम तसेच परफ्युमच्या बाटल्याही चोरी करून नेल्या. विशेष म्हणजे, घरातील दागिने हे रोमाल फर्नांडिस यांच्या आगामी विवाहासाठी आणून सुरक्षित ठेवण्यात आले होते.
लग्नाची तयारी सुरू असताना ही मोठी चोरी झाल्याने कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सकाळी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने दोडामार्ग पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संशयितांच्या हालचाली तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. दोडामार्ग तालुक्यात अलिकडच्या काळात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.













