कासार्डे येथून दुचाकी चोरीस

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 07, 2026 20:06 PM
views 83  views

कणकवली : तालुक्‍यातील कासार्डे - आनंदनगर येथे उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केली आहे. याबाबतची तक्रार राजू आत्‍माराम कदम (रा.कासार्डे, धुमाळवाडी) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. ही घटना ५ मे रोजी पहाटे ३.१८ च्या सुमारास घडली.

  तक्रारदार राजू कदम हे कासार्डे धुमाळवाडी येथे राहतात. ४ मे रोजी रात्री नऊ च्या सुमारास ते दुचाकी (एमएच ०७ अेडी १७४९) घेऊन आपल्‍या घरी जात होते. दुचाकीतील पेट्रोल संपत आल्‍याने ते कासार्डे येथील पोकळे पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी आले. त्‍यावेळी पंपावर पेट्रोल उपलब्‍ध नव्हते. त्‍यामुळे कदम यांनी त्‍यांच्या ताब्‍यातील दुचाकी पेट्रोलपंप लगत राहणारे त्‍यांचे मित्र सचिन नर यांच्या घरासमोरील अंगणात उभी केली. त्‍यानंतर सचिन नर यांनी राजू कदम यांना आपल्‍या दुचाकीवरून कासार्डे धुमाळवाडी येथे सोडले.

 ५ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास राजू कदम यांचा मुलगा रितेश हा नर यांच्या अंगणात उभी केलेली दुचाकी आणण्यासाठी गेला असता, त्‍याला तिथे दुचाकी आढळून आली नाही. त्‍यावेळी त्‍याने आपले वडील राजू कदम यांना फोन करून दुचाकी तेथे नसल्‍याबाबतची माहिती दिली.  त्‍यानंतर सचिन नर यांच्या घराच्या समोर बसविण्यात आलेल्‍या सीसीटीव्ही मधील फुटेज पाहिले असता. ५ मे रोजी पहाटे ३.१८ च्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील एका अनोळखी व्यक्‍तीने डुप्लिकेट चावीने दुचाकी चालू करून तळेरेच्या दिशेने निघून गेल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे ही दुचाकी चोरीस गेल्‍याची फिर्याद राजू कदम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्‍यानुसार अनोळखी व्यक्‍ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.